Rain Yellow Alert महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज आणि उद्या म्हणजेच गुरुवार आणि शुक्रवार या 2 दिवसांत राज्यात पावसाचा जोर अधिक वाढेल.
त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील २३ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाची सुरुवात
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आज पहाटेपासून मुंबईत पुन्हा सक्रिय झाला आहे. विशेषतः विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, सांताक्रुझ आणि वांद्रे या भागांमध्ये अधूनमधून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सुमारे १५ मिनिटे तर हार्बर मार्गावरील गाड्या १० मिनिटे उशिराने धावत आहेत. सुदैवाने पश्चिम रेल्वेची सेवा मात्र सध्या सुरळीत सुरू आहे.
या 23 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. त्यानुसार, ७ ऑगस्ट रोजी खालील जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे:
कोकण: मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगडमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्याने येथे यलो अलर्ट दिला गेला आहे.
पश्चिम महाराष्ट्र: पुणे (घाटमाथा सहित), कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असून, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव येथे वादळी वारे आणि विजांचा कडकडाट असलेला पाऊस होण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र: नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला गेला असून, याठिकाणी विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भ: नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मात्र, अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.
Disclaimer: वरील लेखातील माहिती ही हवामान विभागाने दिलेल्या अंदाजावर आधारित आहे. पावसाची तीव्रता, वेळ आणि स्थानिक परिस्थिती यात बदल होऊ शकतो. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.