Aajcha Havaman Andaj गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पावसाने पुन्हा दमदार पुनरागमन केले आहे. काल राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार सरी कोसळल्या, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा जोरही होता. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतीला नवसंजीवनी मिळण्याची आशा वाढली आहे. 7 ऑगस्ट 2025 रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांत मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात चांगल्या पावसाची नोंद झाली.
विशेष म्हणजे मराठवाड्यात पावसाचा जोर सर्वाधिक दिसून आला. धाराशिव जिल्ह्यात तब्बल 70 मिमी पावसाची नोंद झाली. दुसरीकडे राज्यातील काही भागात उन्हाची तीव्रता वाढली होती. विदर्भात पारा 35 अंशांवर पोहोचला तर अकोला आणि अमरावतीमध्ये तापमान 35 अंशांच्या पुढे गेले.
आज 8 ऑगस्टला पावसाची स्थिती
आज शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025 रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि बीड जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगड, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही विजांसह पावसाच्या सरींचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या भागांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उर्वरित भागांत उष्णतेचा चटका कायम राहील आणि उकाडाही जाणवेल, मात्र काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे.
कमी दाबाचा पट्टा आणि हवामान स्थिती
सध्या मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा फिरोजपूरपासून चंदिगडमार्गे अरुणाचल प्रदेशापर्यंत हिमालयाच्या पायथ्याजवळ सक्रिय आहे. त्याचबरोबर तमिळनाडू किनाऱ्यालगत समुद्रसपाटीपासून 1.5 ते 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत असून, कर्नाटक किनाऱ्यापर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा कायम आहे.
Disclaimer: ही माहिती हवामान खात्याच्या अंदाजावर आधारित असून, हवामानातील बदलानुसार प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असू शकते. वाचकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.