IMD Havaman Andaj मुंबईत पावसाचा कहर, शाळा बंद हवामान विभागाचा रेड अलर्ट; लोकल-वाहतूक विस्कळीत गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात थैमान घालणारा पाऊस आता मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्याकडे वळला आहे.
मुंबईत आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाची संततधार सुरू असून, हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी म्हणजे बुधवार आणि गुरुवार अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पालघर, ठाणे, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट आणि सातारा घाट या भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईत शाळा-काॅलेजांना सुट्टी जाहीर
मुंबईतील पावसाने तुंबईचे रूप घेतल्याने रस्त्यांवर पाणी साचले आहे. रेल्वे ट्रॅकवर पाणी शिरल्यामुळे लोकलसेवा विलंबाने धावत आहेत. परिणामी प्रशासनाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई, पनवेल आणि रत्नागिरी या ठिकाणी सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वाहनचालक आणि प्रवासी त्रस्त झाले आहेत.
रेड, ऑरेंज आणि यलो अलर्टचा पाऊस इशारा
धरणांचे दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 19 ऑगस्ट रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट आणि सातारा घाट या भागात रेड अलर्ट आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट आणि गडचिरोलीसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट आहे. सातारा जिल्ह्यात कोयना धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
महापुरामुळे गावं जलमय, रेस्क्यू सुरू
नद्यांची धोक्याची पातळी ओलांडली, लोकांना स्थलांतर: नांदेड, वाशिम, खेड, चिपळूण आणि नागपूर या भागातील अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. पैनगंगा आणि जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.