Khadya Tel Bhav मुंबईतील बाजारपेठा सध्या सणाच्या तयारीत रंगल्या आहेत. पण यावर्षीही दरवर्षीप्रमाणेच सणाच्या काळात खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. विक्रेत्यांच्या माहितीनुसार, दर प्रतिकिलो ४ ते १० रुपयांनी वाढले असून याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. विशेष म्हणजे, किंमती वाढल्या असल्या तरीही ग्राहकांची मागणी कमी झालेली नाही.
खाद्यतेलाची आवक कुठून होते?
मुंबई बाजारपेठेत शेंगदाणा तेल प्रामुख्याने गुजरातच्या राजकोट, कर्नाटकातील विजापूर व गोंधळा जिल्ह्यातून, तर राईस ब्रॅन तेल छत्तीसगडमधील रायपूर येथून येते. सोयाबीन तेल कोल्हापूर जिल्हा, मध्य प्रदेश आणि राजस्थान येथून मोठ्या प्रमाणात येते.
सध्या शेंगदाणा व सूर्यफूल तेलाचे दर प्रतिकिलो १६० रुपये इतके आहेत. सोयाबीन तेल सुमारे १४० रुपये किलो असून मुंबईत त्याचा वापर तुलनेने कमी आहे. मुंबईबाहेर मात्र सोयाबीनचे दर १३५-१४० रुपये किलो दरम्यान आहेत.
मोहरी व सूर्यफूल तेलाला खास पसंती
मुंबईत राहणाऱ्या उत्तर प्रदेशातील नागरिकांमध्ये मोहरी तेलाची लोकप्रियता जास्त असून त्याचा दर प्रतिकिलो १७० रुपये आहे. युक्रेन युद्धानंतर युक्रेनऐवजी रशियातून सूर्यफूल तेलाची आवक सुरू झाली आहे. शेंगदाणा तेलासोबतच सूर्यफूल तेलालाही मोठी मागणी आहे.
विक्रेत्यांचा अनुभव
दादर येथील व्यापारी उमंग डुंगार्शी यांनी सांगितले की, “यावर्षी सणासुदीच्या काळात तेलाची आवक चांगली झाली आहे. दरवाढ झाली असली तरी विक्री कमी झालेली नाही. तेलाचे दर महिन्यानुसार बदलतात त्यामुळे चढ-उतार होत राहतात.”
सरकी तेल परवडणारे पण मागणी कमी
आरोग्यासाठी हितकारक मानले जाणारे सरकी तेल सध्या प्रतिकिलो १३0 ते १४0 रुपये दरम्यान आहे. महाराष्ट्रातील धुळे, लातूर आणि मराठवाडा भागात याचे उत्पादन होते. मात्र, विक्रेत्यांच्या मते सरकी तेलाला बाजारात फारशी मागणी नाही.
डिस्क्लेमर: या लेखातील माहिती बाजारातील सध्याच्या परिस्थितीवर आधारित आहे. दर व मागणी कालांतराने बदलू शकते. खरेदी करण्यापूर्वी स्थानिक विक्रेत्याकडून अद्ययावत दर जाणून घ्यावेत.